अकोला - जगभरामध्ये कोविड रुग्णांचा हाहाकार सुरू असताना आरोग्य यंत्रणा तणावात काम करीत आहे. लोकप्रतिनिधी कोविड रूग्णांना उपचार मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असले तरी विरोधक त्याला धरून राजकारण करीत असल्याचे चित्र आहे. अकोला तालुक्यातील पळसोबढे हे गाव महत्वाचे गाव आहे. या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र, या केंद्रात कोविड रुग्णांसाठी कुठलीही व्यवस्था नाही. रुग्णवाहिका असून ती बंद आहे. अशी दुरवस्था आरोग्याबाबत येथे आहे. विशेष म्हणजे, हे गाव केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे असून भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर या दोन व्यक्तींमुळे हे गाव जिल्ह्यात केंद्रबिंदूच आहे. असे असतानाही या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी सुविधा नाही, हे दुर्भाग्य आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रुग्णांवर उपचार मिळावे यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन वेळोवेळी प्रयत्न करीत आहेत. कोरोना रुग्णांसाठी या ठिकाणी बेड उपलब्ध नाही. अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाला सहकार्य होणे अपेक्षित आहे. मात्र, बऱ्याच वेळा प्रशासनाच्या चुकावर लोकप्रतिनिधी बोट ठेवत असले तरी चांगल्या कामाचे कौतुकही करीत असल्याची परिस्थिती आहे.
केंद्रीय राज्यमंत्री व भाजप जिल्हाध्यक्षांचे गाव -
विशेष म्हणजे, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांचे मूळ गाव पळसो बढे हे आहे. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्राला 33 गावे जोडलेली आहेत. त्यामध्ये 8 उप-आरोग्य केंद्र आहेत. या गावाची लोकसंख्या जवळपास दहा हजार इतकी आहे. असे असतानाही पळसो बढे या गावातील कोरोना रुग्णांसाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे 33 गावांचा सेवेचा प्रश्न उपस्थित होत नाही.
गावात दररोज ३० हून अधिक कोरोनाबाधित -
या आरोग्य केंद्राला आरोग्यवर्धिनी असे संबोधले जात आहे. आयुष्यमान भारत या योजनेतून याठिकाणी पळसो बढे आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली आहे, हे विशेष. येथे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून तीन आरोग्य सेवक आहेत. या आरोग्य केंद्र च्या अंतर्गत दररोज 30 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण निघत असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती त्यांनी सांगितली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्ण हे शहरात जात असल्याने त्यांची नोंद त्या ठिकाणी होते. तसेच येथे एक ऑक्सिजन बेड आहे. मात्र, ते पण तातडीच्या उपचारासाठी राखीव असल्याने अनेक रुग्णांना शहरात पाठविला जाते. येथे व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही. तसेच टेक्निशनही येथे कार्यरत नाही.
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जनजागृती केल्या जाते. कोरोना टाळण्यासाठी असलेल्या नियमांची माहिती गावागावात दिल्या जात आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. तसेच पळसो बढे ग्रामपंचायत कडूनही यासंदर्भात जनजागृती केल्या जात असल्याची माहिती येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे नवीन रुग्णवाहिका सुरु करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी दहा लाख रुपयांचा निधी रुग्णवाहिका साठी दिला आहे. ती लवकरच येणार असल्याचे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.