अकोला - अकोट फैलमधील मच्छी मार्केटमध्ये ५०० रुपयाच्या बनावट नोटा चालवणाऱ्या जावई व साळ्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज स्थानिक गुन्हे शाखेने केली. पोलिसांनी आरोपींकडून ५०० रुपयाच्या ७९ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. अबरार खान हयात खान व शेख राजीक शेख चांद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी ५०० रुपयाच्या बनावट नोटा मच्छी मार्केटमध्ये चालवत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होत. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अबरार खान यास ताब्यात घेतले व त्याच्याकडून ५०० रुपयाच्या एकच क्रमांकाच्या तीन नोटा जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे एकच क्रमांकाच्या ५४ बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जानोरी येथून अबरारचा साळा शेख राजीक शेख चांद याला देखील अटक केली.
पोलिसांनी शेख राजीक याच्या घरून एकच क्रमांकाच्या २२ बनावट नोटा जप्त केल्या. दोघाही आरोपींना अटक करून त्यांना अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, राजपालसिंग ठाकूर, सदाशिव सुळकर, गणेश पांडे आदींनी केली.
दोघाही आरोपींनी ५०० रुपयाच्या बनावट नोट्या ज्या ठिकाणी चालवल्या त्या ठिकाणांचा शोध पोलीस घेणार आहेत. तसेच, आरोपींनी किती जणांची फसवणूक केली, आणखी किती जणांना बनावट नोटा चालवण्यासाठी दिल्या, याबाबत पोलीस तपास करणार आहे.