अकोला - येथील अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या कार्यालयातच कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी कोंडले. असे अनोखे आंदोलन करीत शेतकऱ्यांनी आज आपला रोष व्यक्त केला.
हेही वाचा- काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेनेचे नेते उद्या घेणार राज्यपालांची भेट
अकोट तालुक्यातील पणज मंडळात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अकोला शहरातील गोरक्षण रोड स्थित न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी कार्यालयात बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडण्यात आले. पणज मंडळमध्ये येत असलेल्या पणज, बोचरा, रुईखेड, वडाळी, वाई देवठाणा येथील अंदाजे 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची केळी पीकाचे नुकसान झाले आहे. तापमान व थंडीमुळे ही पीक खराब झाली आहेत. पणज मंडळातील प्रत्येक गावाचे एक कोटीच्या वर नुकसान झाले होते. गेल्या पंधरा सप्टेंबर पासून ते आजपर्यंत या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून कोणताही क्लेम न मिळाल्यामुळे संतप्त शेतकरी या कार्यालयात धडकले. त्यांनी कार्यालयाच्या आतमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडून जोपर्यंत क्लेम सेटल होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, असा निर्धार करीत आंदोलन केले.