अकोला - मोबाईलवरील अनेक आर्थिक व्यवहार करणारे अॅप हे आपल्या ओळखीचे नसतात, तरी आपण त्या अॅपवर जाऊन तिथे आर्थिक व्यवहार करतो. त्यातून आपली फसवणूक झाली की लगेच आपण बेचैन होतो. शेवटी सायबर पोलिसांकडे धाव घेतो. सायबर पोलिसांनी अशाच एका तक्रारकर्त्याचे पाच लाख रुपये त्यास परत मिळवून दिले आहे.
हेही वाचा - अकोल्यातील अपंग कलाकाराने साकारला 25 हजार पेन्सिलपासून गणपती
फसवणुकीची ही घटना 30 ऑगस्टला घडली. एका उच्चशिक्षीत व्यक्तीने जास्त व्याजदराच्या आमिषाला बळी पडून एका अनोळखी अॅपवर एक दोन हजार नव्हे तर, तब्बल पाच लाख रूपये भरले. परंतु, नंतर अॅपवर अपडेटच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी होवू लागली. तक्रारदारने नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली. संबंधित तक्रारीचे गार्भीय ओळखून तात्काळ सायबर पोलीस स्टेशनकडून त्यावर कारवाई करण्यात आली. सायबर पोलिसांच्या तत्परतेने तक्रारकर्त्याला त्याचे संपूर्ण पाच लाख रुपये परत मिळाले. सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, ओमप्रकाश देशमुख यांनी ही कारवाई केली.
सुरक्षित व्यवहार करणे गरजेचे
इंटरनेटमुळे सर्व व्यवहार हे ऑनलाईन होतात. त्यामध्ये बँकिंग क्षेत्राचे व्यवहारसुद्ध आपण ऑनलाईन करतो, परंतु आपण बॅकिंग व्यवहार करताना ते सुरक्षितरित्या करणे आवश्यक झाले आहे. अलिकडील काळात नागरिकांची अशा व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, काही नागरिक काही फसव्या फोन कॉलला बळी पडतात व त्यांची फसवणूक केली जाते. अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये ग्राहकांना बँकेचे अधिकारी/कर्मचारी असल्याचे भासविले जाते.
पोलीस अधीक्षक यांचे आवाहन
कमी वेळात जास्त नफा, तसेच अधिक व्याजदराला बळी न पडता त्याची संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये. तसेच, ऑनलाईन अॅपद्वारे कर्ज घेत असाल तर सावधगिरीने व्यवहार करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नागरिकांना केले.
हेही वाचा - प्रवीण दरेकरांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे 'जोडे मारो आंदोलन'