अकोला - कौटुंबिक वादातून पती-पत्नीची हत्या (Husband and wife murdered) झाल्याची घटना आज मूर्तिजापूर तालुक्यातील (Murtijapur taluka) सिरसो येथे घडली आहे. किशोर विठ्ठल गिरी (वय, 42) आणि त्यांची पत्नी दुर्गा किशोर गिरी (38) अशी मृतांची नावे आहे. पोलिसांनी सय्यद जाबीर, बेबी गिरी, अर्चना गिरी यांना ताब्यात घेतले आहे. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लोखंडी सब्बलीने हल्ला -
मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो या गावातील गिरी परिवारात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू आहे. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. किशोर गिरी आणि दुर्गा गिरी यांच्या डोक्यात लोखंडी सब्बलने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये किशोर गिरी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. दुर्गा गिरी या गंभीर जखमी झाल्या. तसेच दुर्गाची आई जिजाबाई निरंजन गिरी याही गंभीर जखमी झाल्या आहेत. दोन्ही जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुर्गा गिरी यांचा मृत्यू झाला. दुर्गाची आई जिजाबाई निरंजन गिरी यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
एक आरोपी फरार -
दरम्यान, सय्यद जाबीर, अर्चना गिरी, बेबी मोहन गिरी व ईश्वर पुरी यांचा या सशस्त्र हल्ल्यात सहभाग आहे. याप्रकरणी पोलिसांनी सय्यद जाबीर, बेबी गिरी, अर्चना गिरी यांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी ईश्वरचा पोलीस शोध घेत आहे. मृतकाचा मुलगा रोहन गिरी यांनी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोविंद पांडव करीत आहेत. दरम्यान, या घटनेला अनैतिक संबंधांची किनार असल्याची चर्चा आहे.