अकोला - पालघर येथील घटना दुर्दैवी आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये 101 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, काही राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करीत आहे, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
पालघर येथे तीन जणांची हत्या झाली आहे. यामध्ये तातडीने प्रशासनाने कारवाई करत उच्चस्तरीय समिती स्थापन केली. मात्र, राजकीय पक्ष विविध प्रकारे रंग देत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. सध्या देशात कोरोना विषाणूशी लढाई सुरू आहे. त्यामध्ये अशाप्रकारे राजकारण करणे हे योग्य नाही, असेही देशमुख म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करण्याची विनंती केली आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत या बद्दल बोलाव असून आपली चिंता व्यक्त केल्यावर योगी आदित्यनाथ यांनी ट्विटर वर स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण? -
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथील ग्रामस्थांनी चोर असल्याच्या संशयातून तिघांना ठार केले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. या वातावरणात रात्रीच्या वेळी चोर व दरोडेखोर येत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये पसरली आहे.
दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला गडचिंचले येथील ग्रामस्थांनी गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास रोखले. या प्रवाशांची विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी दगड आणि इतर साहित्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ११० आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी ९ आरोपी १८ वर्षांखालील अपल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडीच्या बाल सुधारगृहात पाठवण्यात आले.