अकोला - मधापुरी गावातील पेढी शेतशिवारात मोहिते कुक्कुटपालन केंद्रात (१० जुलै)रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जवळपास ९०० पिल्लांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कुक्कुटपालन व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. या घटनेत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
'पाच हजार पक्षी'
मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मधापुरी येथील ३० वर्षीय सुशिक्षित बेरोजगार रवी मोहिते या युवकाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी आर्थीक तडजोड करून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. यासाठी कुरुम रेल्वेस्टेशन लगत असलेल्या शेतात पाच हजार पक्षी पालनासाठी टिन शेड उभे केले. हैद्राबाद येथील व्यंकटेश्वरा या कंपनीकडून पक्षांचे संगोपन व पालन करून कमिशन तत्वावर व्यवसाय सुरू केला. या मोबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाची थोडीफार गुजराण होत असे. परंतु, अकस्मात आलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेताच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याचे पाणी कुक्कुटपालन केंद्रात शिरले. त्यामुळे ४ हजार तीनशे पिल्लांतील जवळपास नऊशे पिल्ल पाण्यात बुडून मरण पावली. सोबतच पशुखाध्याच्या बॅग खराब झाल्यामुळे रवी मोहिते यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थाळाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली भेट
कुरुम पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ. तुषार जयस्वाल, डॉ. अतुल रेवस्कर यांनी घटनास्थळी मृत पावलेल्या पक्ष्यांचा पंचनामा केला. सुशिक्षित बेरोजगार असल्याने असे पर्याय शोधले आहेत. मात्र, यामध्येही मोठ्य़ा प्रमाणात अडचणी येत आहेत. अशा व्यवसायांना नैसर्गिक आपत्तीमूळे नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. शासनाकडून त्वरीत आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू असेही जयस्वार म्हणाले आहेत.