अकोला - अकोट तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अनेकांच्या घरावरील छप्पर उडून गेले आहे. रस्त्यावर झाड पडल्याने रस्ते बंद झाले असून वाहनांवर झाडे पडली आहेत.
वडाळी देशमुख परिसरामध्ये फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान -
अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख परिसरामध्ये झालेल्या वादळी पाऊसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पाऊस आणि गारपीट यामुळे लिंबू, पपई, केळी झाडे उन्मळून पडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा पाऊसाने नाहीशा केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली.
महसूल विभागाने पाहणीकरून नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवावा -
पावसामुळे चंडिकापूर व सावरा या रोडवर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने मार्ग बंद झाला आहे. त्याचबरोबर शेतामधील विजेचे खांब व विजेची तार तुटून पडलेले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद पडलेला आहे. तर काहींच्या घरावर झाड उन्मळून पडले आहे. तसेच या वादळी वाऱ्यामुळे झाड पडून दुचाकींचे नुकसान झाले आहे. रस्त्यावर झाड पडल्याने रस्ता बंद पडला आहे. ही परिस्थिती दुरुस्ती करण्यात प्रशासनाला बराच वेळ लागणार असल्याची शक्यता आहे. कच्च्या घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा महसूल विभागाने पाहणीकरून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी फळबाग शेतकऱ्यांकडून होत आहे.
हेही वाचा- अमरावती : अंजनगांव तालुक्यात वादळामुळे केळी पिकांचे नुकसान