अकोला - जिल्ह्यात काल (30 मे) सकाळपासून कडक तापमान होते. त्यातच दुपारी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले. यानंतर जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काल दुपारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली आहेत.
जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली
हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गेल्या तीन दिवसांपासून शहरामध्ये तसेच जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण होते. त्यासोबतच जोरदार वाराही वाहत होता. दुपारी आकाशात ढग निर्माण झाले. पाहता-पाहता जोरदार वारा आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. पावसालाही जोरदार सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. बऱ्याच भागांमध्ये जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक भागातील वीजही गेली.
शेतकरी राजा सुखावला
ग्रामीण भागात या पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सध्या शेतकऱ्यांची खरीप पिकांची तयारी सुरू आहे. शेत पेरणीसाठी जवळपास तयार आहे. शेतातील सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. शेतकऱ्यांना आता मृगाच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
कुठलीही जीवितहानी नाही
अनेक ठिकाणी जोरदार वारा आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडली. अकोला शहरातील हरिहर पेठ या ठिकाणी एक झाड उन्मळून पडले. या झाडाखाली दुचाकी दबली. त्यामुळे या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, जिल्ह्यातील नुकसानीबाबत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने कुठलिही घटना घडली नसल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - फार्म हाऊसवर डान्सपार्टी : पुण्यातील राजगड पोलिसांची कारवाई; तेरा जणांवर गुन्हा दाखल