अकोला - पातूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने निर्गुणा नदीला मोठा पूर आला आहे. तालुक्यातील अंधारसावंगी परिसरात नदीला आलेल्या पुरात 40 ते 50 जनावरे वाहून गेल्याची माहिती आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी वाढणार असल्याने नदी काठच्या गावांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जोरदार पावसाचा अंदाज
जिल्ह्यात हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे. या अंदाजनुसार जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस पडला आहे. पातूर तालुक्यात मात्र पावसाने कहरच केला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. येथील निर्गुणा नदीला पूर आला आहे. या पुरात 40 ते 50 जनावरे वाहून गेली आहेत. पाण्याचा प्रवाह इतका होता की त्यांना बाहेर काढणेही ग्रामस्थांना शक्य झाले नाही. दरम्यान, अजूनही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीकाठच्या गावांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
पीकांचे नुकसान
विजांच्या कडकडाट पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतीचे नुकसान होत आहे. अनेक भागातील शेतीत पाणी साचले आहे. काढणीला आलेला सोयाबीन आणि बोन्ड धरणाऱ्या कपाशीचे यामुळे नुकसान झाले आहे. तसेच मूग, उडीद, तुरीच्या पिकांचेही नुकसान होत आहे.
सतर्कतेचा इशारा
अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात 96.60 टक्के पाणी साठा झाल्याने या प्रकल्पाचे आज सकाळी सात वाजता सहा दरवाजे 30 सेमीने उघडून 153.49 घमी, प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती शाखा अभियंता नीलेश घारे यांनी दिली. तसेच वाण प्रकल्पाचेही दोन दरवाजे 30 सेमीने उघडण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही प्रकारच्या शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाण्याचा विसर्ग
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाची जलाशय पातळी 347.62 मीटर असून त्यापैकी उपयुक्त जलसाठा 83.416 दलघमी आहे. सध्या हा प्रकल्प 96.60 टक्के भरला आहे. या प्रकल्पातील पाणी लक्षात घेता तो लवकरच शंभर टक्के भरून जाण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळा अजून लांबल्यामुळे या प्रकल्पात पाणी अधिक वाढू नये, म्हणून या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यानुसार या प्रकल्पाचे सहा दरवाजे 1, 4, 5, 6, 7, 10 क्रमांकाचे दरवाजे 30 सेमीने उघडण्यात आली आहे. या दरवाज्यातून 153.49 घमी, प्रति सेकंद सोडण्यात येत आहे.
वान प्रकल्पामधूनही विसर्ग
वान प्रकल्पामधून ही विसर्ग करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे दोन वक्रद्वार उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पात 411.63 मीटर पाणीसाठा सक्षमता असून सध्या यामधून 80.17 दलघमी असून सध्या 97.82 टक्के भरलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे दोन वक्रद्वार 30 सेंमीने उघडण्यात येत आहेत. दरम्यान, दोन्ही प्रकारच्या शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.