अकोला - पातूर शहरामध्ये पहाटे एका हार्डवेअर आणि फर्निचरच्या गोदामाला आग लागली. घटनास्थळी दाखल झालेल्या पातूर अग्निशामक दलाने आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत गोदामातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जवळच उभी असलेली लक्झरी बसही आगीच्या भक्ष्यस्थानी आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
पातूर येथे धनसकार यांचे हार्डवेअर आणि फर्निचरचे गोदाम आहे. या गोदामाला अचानक आग लागली. या आगीने संपूर्ण गोदाम आपल्या भक्ष्यस्थानी घेतले. आग लागल्याची माहिती पातूर पोलीस आणि पातूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला मिळाली. त्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी जमा झालेली गर्दी पोलिसांनी दूर करत लॉकडाऊनचे नियम पाळण्यास सांगितले.
लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून हे गोदाम बंद होते. अचानक लागलेल्या या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.