अकोला - जीम सुरु करण्यास परवानगी देण्यास प्रशासन नकार देत आहे. यामुळे जीम मालक, ट्रेनर्स यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर जीम सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे देशातील सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. देशात चार लॉकडाऊन नंतर अनलॉक १.० सुरु आहे. राज्य शासनाने या काळात अनेक क्षेत्रांना काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे जीम सुरु करण्यास परवानगी मिळावी अशी, मागणी जीम मालक आणि ट्रेनर्स यांनी केली.
तसेच ज्या पदार्थांमुळे आरोग्य खराब होते, अशा पदार्थाला विक्रीची परवानगी सरकारने दिली आहे. एकीकडे जीम बंद पडल्याने नागरिकांचे आरोग्य खराब होत आहे. तर दुसरीकडे मद्यविक्री करण्यास सरकार परवानगी देत आहे, असा आरोप निदर्शकांनी केला.
सरकारने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून जीम सुरू करण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्यांच्या काम जाणार नाही. याबाबत अकोला येथील जिम ट्रेनर्स व मालकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रशिक्षक चंदू अग्रवाल, रोहन अडगावकर, अभिषेक मांडोलकर, आकाश थोरात आणि राम खांबलकर यांच्यासह आदी उपस्थित होते.