अकोला - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना-भाजप सरकार पुन्हा राज्यात येणार असा आपला विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळात मंत्री राहील किंवा नाही हे मला माहीत नाही. परंतु, पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यात यशस्वी झाल्याचे समाधान पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केले.
नुकत्याच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत युतीची सत्ता येणार आहे, यामध्ये कुठलीच शंका नाही. सध्या मी विधानपरिषदेचा आमदार आहे. २०२३ पर्यंत मी या पदावर कायम राहणार आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याकडे हा एक प्लॅटफॉर्म आहे.
मी मंत्री असो किंवा नसो, पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे कर्तव्य माझे आहे आणि ते पार पाडण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिली किंवा नाही याचे शल्य मला राहणार नाही. तसेच जिल्ह्यात सलग ५ वर्षे पालकमंत्री राहणे हाच एक माझ्यासाठी बहुमान आहे. पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल, ती सांभाळणार असल्याचे यावेळी डॉ. पाटील शेवटी म्हणाले.