अकोला - प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी निषेध केला. या हत्येप्रकरणी आम्ही सुपारी देणाऱ्यापर्यंत पोचणार, असे मत व्यक्त करीत जिल्ह्यातील हुंडी चिठ्ठी आणि खदानीच्या विषयांवर अंकुश लावण्याचे काम पुंडकर यांच्या माध्यमातून पालकमंत्री कडू करत होते. यामध्ये कोट्यवधींचे व्यवहार झाले असून यातून सामान्य लोकांना फसविले आहे. अनेक दुवे या घटनेला जोडून पाहू शकतो, असे म्हणत पालकमंत्री कडू यांनी हुंडी चिठ्ठी आणि खदान व्यावसायिकांवर अप्रत्यक्षपणे संशय व्यक्त केला आहे.
हेही वाचा - अकोल्यात प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार; प्रकृती गंभीर
पुंडकर यांच्यावर अकोट शहर येथे शुक्रवारी रात्री गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची डॉक्टरांसोबत विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी अकोट शहर येथील घटनास्थळावर जाऊन भेट देऊन पोलीस अधीक्षक आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या घटनेची संपूर्ण चौकशी योग्य प्रकारे व्हावी, असे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा - प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पुंडकर यांच्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
पुंडकर हा राज्य व्यापून टाकणारा कार्यकर्ता होता. तो सच्चा आणि दिशा देणारा कार्यकर्ता होता, असे गौरवोद्गार कडू यांनी काढले. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊनच थांबेन, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. याबाबत गृहमंत्र्यांशीही बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. पुंडकर वाचेल, असे मला वाटत होते. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अशाप्रकारे सुपारी देणाऱ्या घटना महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याप्रकरणी पडद्यामागे काम करणाऱ्यांचा शोध घेतला जाईल. शोध लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे सांत्वन केले.