अकोला - एक-दोन नव्हे, तर चक्क २२ ठिकाणी चोरी करून धान्य पळविल्याची घटना अकोला येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून 11 लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख रफिक शेख बशीर (५०), सैयद अमीन सैयद अली (२५) तसेच ख्वाजा इम्रानउद्दीन ख्वाजा अमीरोद्दीन (३०), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी दोन अन्य साथीदारांसह मिळून २०१९ पासून आजपर्यंत २२ ठिकाणी चोरी केल्याची कबूली दिली.
अल्पावधीतच टोळीच्या मुसक्या आवळल्या -
बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात ५ फेब्रुवारीला रविंद्र किसनराव सानप या शेतकऱ्याने धान्य चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. शेतातील गोदामाचे कुलूप तोडून सोयाबीन व तुरीचा एक लाख ६८ हजार ७४४ रुपयांचा माल चोरीला गेला, असे या तक्रारीत म्हटले होते. ही तक्रार दाखल झाल्यानंतर धान्य चोरीच्या इतरही घटनांबाबत पोलीस माहिती घेत होते. तेव्हा अनेक गुन्हे या संदर्भात दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी अल्पावधीतच धान्य चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.
येथे दाखल होते गुन्हे -
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल धान्य चोरीच्या गुन्ह्यासह बाळपूर, दहिहांडा, उरळ, जुने शहर, पातुर, माना, चान्नी आणि तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल एकूण २२ धान्य चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा आरोपींनी दिलेल्या माहितीवरून झाला. आरोपींकडून पाच लाख १६ हजार ४०० रुपये, गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन मिनी ट्रक क्र. एमएच ३० बीडी ०६१७ तसेच मो.सा क्रमांक एमएच ३० बीके १४५३ व गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल, असा एकूण ११ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.