अकोला - विधानपरिषदेच्या निवडणुकीचा(Legislative Council Election 2021) बिगुल वाजला आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया(Shivsena Mla Gopikishan Bajoria) आणि भाजपकडून वसंत खंडेलवाल( BJP Candidate Vasant Khandelwal) हे निवडणुकीच्या रिंगणात समोरासमोर उभे आहेत. दरम्यान, भाजपकडून घोषित करण्यात आलेल्या नावामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सेनेकडून गोपीकिशन बाजोरिया हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. गेल्या तीन वेळा ते या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आले आहेत. त्यांचे सर्वच पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या ते नेहमीच संपर्कात असतात. त्यामुळेच ते गेल्या तीन वेळापासून या निवडणुकीत निर्विवाद निवडून आले आहेत.
या निवडणुकीत आता भाजपकडून मातब्बर नाव समोर आले आहे. त्यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी जवळीक संबंध आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जवळचे ते मित्र आहेत. त्यामुळेच त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळाल्याचे बोलले जात आहे. भाजपमधून इतरही इच्छुकांची नावे आघाडीवर होती. मात्र, वसंत खंडेलवाल यांचे नाव त्या यादीत आल्याने इतर इच्छुकांची नावे आपोआपच मागे पडली. त्यामुळे वसंत खंडेलवाल हेच बाजोरियांना टक्कर देऊ शकतात, अशीच चर्चा रंगली.
- कोण मारणार बाजी?
या निवडणुकीत आता बाजोरिया आणि खंडेलवाल या दोघांपैकी विजयासाठी सर्वात जास्त कोण ताकद लावणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडे तीन पक्षांचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी आहेत. तर भाजपकडे फक्त भाजपव्यतिक्ति इतर कुठल्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी नाहीत. दरम्यान, या निवडणुकीत गेल्या तीन वेळा आमदार बाजोरिया यांनी इतरही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आपल्याकडे ओढून विजयाची पताका पदरात टाकली होती. मात्र, यावेळी भाजपच्या लोकप्रतिनिधींना ते आपल्याकडे ओढू शकतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
- 'वंचित'कडून अजून उमेदवार घोषित नाही -
वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींवर आता या दोन उमेदवारांच्या विजयाची भिस्त आहे. वंचितकडून आद्यापही त्यांच्या उमेदवारांचे नाव घोषित झालेले नाही. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या निवडणुकीत उभे राहु शकतील का, याबाबत मात्र कुठलेच संकेत पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले नाही. त्यामुळे या निवडणुकीत वंचित नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच वंचित या निवडणुकीत कोणाच्या बाजूने उभी राहील, हेही सध्या कोडेच आहे.