अकोला - अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोली पद्धतीने शेतकऱ्यांचा माल विकत घेण्याचा प्रकार बुधवारपासून सुरू झाला आहे. त्यामुळे या प्रकारामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. जागेवरच शेतकऱ्यांचा मालक जात असून अडत्यांची मध्यस्ती बंद झाली आहे. जिल्ह्यातील तेल उत्पादक कंपन्यांकडून हा माल खरेदी होत आहे. सध्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती(Akola APMC)मध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. परिणामी, तेल उत्पादक कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा थेट माल बोली पद्धतीने विकला जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना भाव चांगला मिळत आहे.
शेतकऱ्यांना फायदा
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल अडत्यांमार्फत विकला जात होता. परिणामी, शेतकऱ्यांना चांगल्या भावाची वाट पाहावी लागत होती. जोपर्यंत चांगला भाव मिळत नव्हता, तोपर्यंत शेतकरी त्यांचा माल मार्केटच्या आवारातच ठेवून देत होते. यामुळे बऱ्याच वेळा त्यांचा माल खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, आता अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोली पद्धतीने शेतकऱ्यांचा भाव विकला जात आहे. या पद्धतीला सुरुवात झाली असल्याची माहिती येथील काही व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या पद्धतीने सुरू झालेला हा माल खरेदीचा प्रकार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
जादा दर मिळण्याची शक्यताही वाढली
शेतकऱ्यांसमोरच मालाला किती भाव मिळतो, हे स्पष्ट होते. तसेच मालामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटींची शक्यता राहिली नाही. जादा दर मिळण्याची शक्यताही वाढली आहे. यामुळे अडत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबली आहे. परिणामी, आता शेतकरी स्वतः मालाच्या बोलीवेळी उभा राहून मालाची विक्रीची प्रक्रिया पाहत आहे, हे विशेष.