अकोला - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज गोंधळ झाला. भाजपा-सेना नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की, मनपा आयुक्त आणि विरोधी पक्षनेते आणि एमआयएम नगरसेवकांत वाद यामुळे सभा चांगलीच गाजली. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सभागृहात जाण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना सुरक्षारक्षकांनी बाहेरच अडवून ठेवले.
काँग्रेसच्या नगरसेवकांनी आणले अस्वच्छ पाणी
मनपाच्या सर्वसाधारण सभेच्या सुरवातीला शिवसेनेने भाजपा सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बॅनर घालून निषेध केला. तर काँग्रेसचे नगरसेवकाने दूषित पाण्याचा प्रश्न उपस्थित करून दुषित पाणी सभेत आणले आहे. हा प्रकार सुरू असताना 'आप' पदाधिकाऱ्यांनी सभेत येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. तर दुसरीकडे शहरात अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याच्या कारणावरून काँग्रेसच्या नगरसेवकांनी अस्वच्छ पाणी सभागृहात आणले. त्यावर जलप्रदाय विभागाला जाब विचारला. नगरोत्थान योजनांच्या कामांबाबत निधी वाटपावरून शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा हे भाजपाचे नगरसेवक विजय अग्रवाल यांच्याशी बोलत असताना भाजपाचे नगरसेवक अनिल मुरूमकार यांनी 'भांडारा आहे का' असे म्हटले. त्यामुळे चिडलेल्या राजेश मिश्रा यांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले. यानंतर शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांनी नगररचनाकार नाकोड कुठे आहेत, असे विचारल्याने नगररचनाकार यांनी सभागृहातूनच पळ काढला.
आयुक्तांचा काढता पाय
या सर्व प्रकारानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी स्पष्टीकरण दिले. परंतु त्यामध्ये विरोधीपक्ष नेते साजिद खान पठाण यांनी आक्षेप घेत आपली नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर एमआयएम नगरसेवक मुस्तफा खान यांनी आयुक्त कापडणीस यांना जाब विचारला. परंतु, त्यावर योग्य उत्तर न मिळाल्याने नगरसेवक मुस्तफाखान यांनी आवाज उठविल्याने मनपा आयुक्त यांनी सभेतून पळ काढला. परंतु, नगरसेवकांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते आपल्या जागेवर येवून बसले. त्यानंतर सभा शांततेत सुरू झाली होती.