अकोला - शहरात धुमधडाक्यात गणेश विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. पोलीस बंदोबस्तात ही मिरवणूक शांततेत पार पडली. दक्षता नगरातील पोलीस बॉईज गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीनंतर रात्री 12 वाजता सर्व मिरवणुकांची समाप्ती झाली.
हेही वाचा - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत थायलंडमधून आलेल्या भाविकांचा बाप्पांना निरोप
जयहिंद चौकातील महापूजनानंतर मानाच्या बाराभाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सायंकाळी सात वाजता मानाच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर राजराजेश्वर गणपतीसह इतर गणपतींचे विसर्जन झाले. जवळपास 40 गणपतींचे विसर्जन मोरणा नदीवरील गणेश घाटावर करण्यात आले. दिंडी, ढोलताशांच्या गजरात, लेझीम पथकाच्या निनादात आणि भक्तांच्या अलोट गर्दीत बाप्पाला निरोप देण्यात आला. त्यानंतर हे गणपती बाळापूरच्या नदीत विसर्जित होतात. या मिरवणुकीत 56 सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरा यांच्यासह केंद्रीय बटालियन, राज्य राखीव दल, अकोला पोलीस तसेच गृहरक्षक दलाचे जवान तैनात होते.
शासनाने दिलेल्या वेळेपर्यंत गणेश मंडळांनी वाद्य वाजवून जल्लोष केला. त्यानंतर मंडळांनी पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन होवू नये, याची काळजी घेतली. पोलीस बंदोबस्तात अमरावती पोलीस महानिरीक्षक रानडे, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. विक्रांत देशमुख, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्यासह शहरातील सर्वच पोलीस निरीक्षकांचा सहभाग होता.