अकोला - भारतीय संविधान आणि लोकशाही संवर्धनासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेचा वापर करावा. सर्व सरकारी शाळेत सीबीएसई पॅटर्न सुरू करून मोफत शिक्षण द्यावे, इत्यादी मागणीसाठी फुले-आंबेडकर विद्वत सभेतर्फे शनिवारी रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ही रॅली अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती.
सर्व सरकारी शाळेत सीबीएसई पॅटर्न सुरू करा. जनतेची लाखो रुपयांची लूट करणाऱया खासगी शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेसना थांबविण्यासाठी समान शिक्षण, मोफत शिक्षण देण्यात यावे. लोकांचा लोकशाही वरील विश्वास दृढ करण्यासाठी भारतातील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यात यावा, डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, उच्च शिक्षण संस्थेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा जातीय छळ थांबविण्यासाठी रोहित विमुलाच्या नावे कठोर कायदा करण्यात यावा, या मागणीसह इतर मागण्यांसाठी ही रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीत जिल्हाध्यक्ष प्रा. विजय आठवले, प्रा. सुरेश मोरे, प्रा. प्रमिला बोरकर, डॉ. बाळकृष्ण खंडारे, भाऊसाहेब थोरात, संतोष रायबोले, बाबाराव खंडारे, आनंद डोंगरे, संध्या खंडारे, अॅड. मंगेश बोदडे आदी उपस्थित होते.