अकोला: नदीम शाह दिवान (३०, रा. दहिहांडा) असे मुख्य आरोपींची नाव आहेत. तर आसिफ शहा बशीर शहा (वय ३५), मोशीन शहा मेहबुब शहा (वय २३), एजाज शहा रहेमान शहा (वय २३) अशी त्याच्या सहकाऱ्यांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात 'एनसीबी'चे अधिकारी असल्याचे भासवत चौघेजण वावरत होते. त्यांनी अनेक ठिकाणी अधिकारी असल्याचे सांगून भेटी दिल्या. हे चौघेही चारचाकी वाहनावर अंबर दिवा लावून वाहनाच्या मागे-पुढे भारत सरकार असे स्टीकर चिकटवून फिरत होते. पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांना ही माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी माहिती काढली असता सत्य समोर आले. अखेर ठाणेदार राऊत यांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली. यावेळी चौघेही 'एनसीबी'च्या नावाचा गैरवापर करत असल्याचे लक्षात आले.
गुन्हा दाखल: ठाणेदार राऊत यांनी मुंबई येथील 'एनसीबी'च्या कार्यालयात ईमेलद्वारे माहिती दिली. त्या माहितीवरून 'एनसीबी'चे अधिकारी अमोल मोरे हे अकोल्यात आले आणि त्यांनी चौकशी केली. यांमध्ये चौघेही जण तोतया असल्याचे समोर आले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या चौघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले आहे.
'व्हिजिटिंग कार्ड'ही होते सोबत: दहिहंडा पोलिसांनी आरोपींकडून 'गर्व्हमेंट ऑफ इंडिया डेप्युटी झोनल डायरेक्टर ऑफ एनसीबी' असा लोगो आणि अंबर दिवा लावलेल्या कारसह बनावट ओळखपत्र, दोन प्रकारचे व्हिजिटिंग कार्ड आणि शिक्का जप्त केला आहे.
नदीमला व्हायचे होते 'आयपीएस': चौघांपैकी नदीम हा उच्च शिक्षित आहे. तो 'एमटेक इंजिनीयर'पर्यंत शिकलेला आहे. 'आयपीएस' अधिकारी व्हायचे त्याचे स्वप्न होते; मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. तर तिघे जण अचलपूरचे रहिवासी आहेत. आरोपींनी स्वत:ला अधिकारी असल्याचे भासवत बेरोजगारांना 'एनसीबी'मध्ये भरती करून देण्याचे आश्वासन दिले असावे असा पोलिसांना संशय आहे. आरोपींनी बेरोजगारांना नोकरीचे आमीष दाखवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असल्यास पीडितांनी समोर येऊन पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी केले आहे. या चौघांनी आणखी कुठे कुठे अशाप्रकारे तोतयेगिरी केली याचा तपास पोलिस करणार आहे.