अकोला - कोरोना महामारीने देशभरात थैमान घातले आहे. यात सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसांची मदत करण्यासाठी अनेक हात अकोल्यात सरसावले होते. त्यात अग्रेसर होते अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार. आता रविवारी सकाळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना संकटात त्यांनी लोकांची मदत करत कमीत कमी दहा हजार मास्क आणि आयुर्वेदिक काढा वाटला आहे. सुरुवातीला त्यांनी संस्थेकडून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सर्व मित्रमंडळींने त्यांना मास्क निर्मिती करून वाटप करण्याचा सल्ला दिला.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आयुर्वेदिक काढ्याचे तर मास्क वितरण शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते एप्रिल महिन्यातच पार पडला. मात्र, म्हणतात ना निसर्गाची रीतच न्यारी असते. महामारीदम्यान समाजकार्य करणाऱ्या या माजी आमदारांनाही कोरोनाची लागण झाली. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.