अकोला - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रदीप उर्फ गोलू सुरेश दांडगे, असे त्या शिक्षा सुणावलेल्या नराधमाचे नाव आहे.
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रदीप दांडगे (वय -२५) याने चॉकलेट देण्याचे आमिष देऊन घरात बोलावले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यानंतर पीडित मुलीने आईला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने जुने शहर पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबर २०१३ रोजी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करीत न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात याप्रकरणी सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलँड यांनी आरोपी प्रदीप दांडगे यास जन्मठेप व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याची शिक्षाही ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे मंगल पांडे यांनी बाजू मांडली.