अकोला - गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मृत झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील नदीत वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून, दुसऱ्याचा शोध सुरूच आहे.
जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पाच जणांचा मृत्यू
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागम झाले आहे. ग्रामीण भागासह शहरातही अधून-मधून पाऊस होत आहे. त्यामुळे नदी व नाल्यांना पूर आला असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तलावांमध्येही मुबलक पाणी जमा झाले आहे. त्यामुळे सोमवारी (ता.६) आणि मंगळवारी (ता. ७) जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला.
मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे
त्यामध्ये अकोला तालुक्यातील आगर येथील मनोज खाडे याचा तलावात बुडून, तर कानशिवणी येथील सागर गोपाल कावरे आणि गोपाल कांबे यांचा पोळ्याच्या दिवशी बैल धूत असताना नदीच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. त्यापैकी गोपाल कांबे याचा मृतदेह जांब येथे सापडला आहे. दरम्यान, सागर कावरे याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत
याव्यतिरिक बार्शीटाकळी तालुक्यातील एरंडा येथे सोमवारी (ता. ६) रात्री झालेल्या पावसामुळे भिंत कोसळून श्यामराव आप्पा पवार (वय ७०) यांचा मृत्यू झाला. तर, तेल्हारा तालुक्यातील खेलसटवाजी येथील येनुद्दीन फखरूद्दीन यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटनांसह चोवीस तासांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.