अकोला - शहरातील भाजी बाजारात असलेल्या किराणा दुकानाला सोमवारी रात्री उशिरा आग लागली. या दुकानाला लागलेल्या आगीचे लोट आजबाजूला पसरल्याने आसपासची तीन दुकाने जळाली. अग्निशामक दलाच्या तीन बंबानी ही आग आटोक्यात आणली. ही आग लागली त्या दुकानाच्यावर फरसाण बनवण्याचा कारखाना असून या अगोदर देखील या दुकानाला आग लागली होती.
अकोला शहरातील गांधी चौक स्थित मुख्य बाजारपेठेत असलेल्या 'प्रेम नमकीन' व 'जय महाकाल सुपारी' या दुकानाला आग लागली. लॉकडाऊन असल्याने दुकाने पाच वाजताच बंद होत असल्याने आग लागल्याची माहिती लवकर समोर आली नाही. जेव्हा आगीचे लोट बाहेर दिसले तेव्हा स्थानिक नागरिकांनी लगेच घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी शॉर्टसर्किटमुळे लागली की फरसाण बनवण्याच्या कारखाण्यामुळे हे तपासाअंती निष्पन्न होईल. या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नाही मात्र, दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या अगोदरसुद्धा याच दुकानांना आग लागली होती. तरी देखील येथील फरसाण बनवणाऱ्या कारखान्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. यावेळी देखील तिथेच आग लागली. त्यामुळे प्रशासन मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.