अकोला- महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात रिकाम्या वेळी पत्त्याचा खेळ आणि दारूचा अड्डा बनलेला असतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत बाहेरच्या व्यक्तीही येथे खेळायला येतात. त्यामुळे हा अग्निशमन विभाग आहे की क्लब आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा- सोना अलॉईज मारहाण व खंडणी प्रकरण; छ. उदयनराजेंसह ११ जणांची निर्दोष मुक्तता
दरम्यान, हा प्रकार मनपा आयुक्त यांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन विभाग प्रमुख राजेश ठाकरे यांना निलंबित केले आहे. तर दोन मानसेवी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. आग लागल्यावर विझविण्यासाठी सर्वातप्रथम फोन केला जातो तो अग्निशमन दलाला. परंतु, आग लागण्याच्या घटना ह्या सतत घडत नसतात. तरीही येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेहमीच सतर्क असणे आवश्यक आहे. मात्र, अधिकारी व कर्मचारी कार्यालयात नेहमीच उपस्थित असले तरी ते पत्ते आणि दारू पिण्यात मश्गुल असतात. बऱ्याचवेळा फोन लावला तर फेक फोन येतात म्हणून तेही उचलण्याची तसदी या वेळात ते घेत नसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सायंकाळी पासून तर रात्रभर येथे हा प्रकार सुरू असतो. अनेक कर्मचारी तर गाडीच्या आतमध्ये बसून पार्टीचा आनंद घेतात. येथील अग्निशमन विभाग प्रमुख राजेश ठाकरे यांचेच गैरवर्तन होत असल्याने त्यांचा कर्मचाऱ्यांवर कसा वचक असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, याबाबत पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार झाली. त्यांनी लगेच मनपा आयुक्त जितेंद्र पापळकर यांना माहिती दिली. त्यांनी चौकशी करून अग्निशमन दलाचे प्रमुख राजेश ठाकरे व दोन मानसेवी कर्मचारी गुलाम मुस्तफाखान आणि शेख मुजाहिदी खान यांना बडतर्फ केले आहे.