अकोला - मोहम्मद अली रोडवरील एका चप्पलच्या दुकानाला आज पहाटे अचानक आग लागली. या आगीने इमारतीच्या दुसर्या मजल्यापर्यंत पेट घेतल्याने दुसऱ्या मजल्यावरील घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. या घरातील २ वृद्धांना वाचविण्यात आले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार बंबांनी परिश्रम केले.
मोहम्मद अली रोडवर सईद खान शमशेर खान यांचे चप्पल चे दुकान आहे. या दुकानात पहाटे अचानक आग लागली. या आगीत दुकानातील चप्पलने पेट घेतला. त्यामुळे ही आग पसरली. या आगीने पूर्ण इमारतीला कवेत घेतले. तोपर्यंत अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाने या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन वृद्धांना खाली उतरून त्यांचे प्राण वाचविले.
या आगीत घरातील संपूर्ण कागदपत्रे व रोख रक्कम जळाली असून या घरातील एका सिलिंडरचाही स्फोट झाला आहे. या आगीने इमारतीच्या दुसर्या मजल्यापर्यंत पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या उपस्थितीमुळे या आगीने आजूबाजूच्या इमारतींना कुठलीही क्षती झाली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे चार बंब कामी आले असून यावेळी पोलीस बंदोबस्तही तगडा होता.