अकोला - बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करुन पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी एमराल्ड हाईट्स स्कूलच्या (रिंग रोड, केशवनगर) मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता शाळेबाबत उच्चस्तरीय समिती चौकशी करणार आहे.
यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, असा सवाल यापूर्वीच्या एका समिती काढलेल्या निष्कर्षावरुन नोटीसमध्ये विचारला आहे. या प्रकरणात पालकमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे रूप मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केशव नगरातील एमराल्ड हाईट्स स्कूलबाबत पालकांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. चौशीअंतर्गत समितीने पालक, शाळेच्या मुख्याध्यापिकांशीही चर्चा केली. शाळेची पाहणीही केली. त्यानंतर समितीने शिक्षण विभागाला अहवाल सादर केला. या अहवालात स्कूलमध्ये आढळून आलेल्या गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला. त्यानुसार अखेर शुक्रवारी स्कूलचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापिकेविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता शिक्षण विभागाने शाळेची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस बजावली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी सुद्धा शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावल्या होत्या. परंतु, शाळेकडून खुलासा प्राप्त झाला नाही. एमराल्ड हाईट्स स्कूलला तिसऱ्या नोटीसमध्ये इशाराच दिला आहे. खुलासा प्राप्त न झाल्यास शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) आणि शुल्क अधिनियमचा भंग केल्याच्या कारणावरुन शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी तिसऱ्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे. त्यासोबतच शाळेच्या कारभाराच्या चौकशीसाठी चार जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यात निवृत्त उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेमधील तज्ज्ञांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यामध्ये आता पालकमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष घातले आहे.