अकोला - यंदाचे वर्ष सर्वांसाठीच कठीण जात आहे. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नसतानाही कठीण परिस्थितीत त्यांनी पेरणी केली. पेरणीनंतर पाऊस न पडल्याने बोटभर उगवलेले सोयाबीन पाण्याविना तग धरत नसल्याने बोरगाव मंजू येथील शेतकऱ्यांनी त्यावर नांगर व तास फिरवून पूर्ण पीक काढून टाकले. दुपार पेरणीसाठीचा प्रश्न त्यांचा निर्माण झाला आहे.
बोरगाव मंजू परिसरात 15 जून रोजी पाऊस पडला. या पावसापूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर पाऊस एक दोन दिवस नव्हे तर 12 दिवस झाले तरी पडला नाही. सोयाबीनला पुरेसे पाणी न मिळाल्याने सोयाबीनची वाढ खुंटली. बोटभर पीक उगवले. कडक ऊन आणि जोरदार हवेने जमिनीतील ओलावा शोषून घेतला. त्यामुळे सोयाबीनला वाढीसाठी पोषक वातावरण राहिले नाही. त्यात कडक उन्हामुळे सोयाबीनच्या पीकाने मोठे होण्याआधीच मान टाकली. सोयाबीन फक्त दहा टक्केच उगवले. पीक वाढत नसल्याने बोरगाव मंजू येथील भाग 3 या क्षेत्रातील शेत सर्व्हे नंबरमधील 343 परिसरातील आठ ते दहा शेतकऱ्यांनी संपूर्ण सोयाबीनवर नांगर फिरविले.
आधीच कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यात शेतकऱ्यांकडे पैसे नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी केली. सुरूवातीला पेरणीयुक्त पाणी आले. नंतर पावसाने दडी मारली. 12 जुननंतर पाऊस गायबच झाला. काही भागात पाऊस पडला. तर काही भागात कडक ऊन पडले. ज्याठिकाणी पाऊस पडला नाही ते शेतकरी पाण्याची वाट पाहून थकले आहेत. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत पिकावर नांगर फिरवले. सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार करूनही कृषी अधिकारी चौकशी समिती त्यांच्याकडे येऊनही पाहत नसल्याची स्थिती आहे. वैभव तायडे, जगदीश जीराफे, विनोद खेडकर, हरिभाऊ वैराळे, कलीमोद्दीन कयामुद्दीन यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.
कोमेजणाऱ्या सोयाबीनला जगवण्यासाठी केला स्प्रिंकलरचा उपयोग
पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्यानंतर पीक पाहून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाऊसच येत नसल्याने शेतकऱ्याने स्प्रिंकलरचा उपयोग करून सोयाबीनला वरच्या बोअरचे पाणी देत आहेत.