अकोला - दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवर येथून शेतकऱ्यांच्या वाहनांचा ताफा नागपूरकडे रविवारी रवाना झाला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांचे नेतृत्व किसान सभा भाकप आयटकचे सदस्य नयन गायकवाड हे करत आहेत. केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेले नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. ते तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोल्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी शिवरमधून आज दिल्लीकडे रवाना झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या वाहनांना सचिव रमेश गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी प्रकाश रेड्डी, राजू देसले, मधुकर पाटील, सुमित गायकवाड, नयन गायकवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी नयन गायकवाड बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने तयार केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे ते तातडीने रद्द करावेत. जोपर्यंत कायदे मागे घेतले जाणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आज आंदोलनाचा 37 वा दिवस आहे, या आंदोलनामध्ये आतापर्यंत 33 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र सरकारला अजूनही जाग आलेली नाही, सरकारला जागे करणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज शेतकरी दिल्लीकडे रवाना होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.