अकोला - तीन पिढ्यांपासून एकाच गावात राहत असूनही जागेचा हक्क न मिळाल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जागेचा नमुना 8-अ देण्याची मागणी केली.
अकोट तालुक्यातील आंबोडा गावातल्या झिंगा भोई समाजाचे शेतकरी हे साधारणपणे १९२३ पासून या गावात राहत आहेत. म्हणजे जवळपास तीन पिढ्या या गावांमध्ये राहत आहेत. तरीही, या जागेवर त्या लोकांचा मालकीहक्क अजूनही नाहीये. या जागेचा आठ-अ नमुना त्यांना दिले नसल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे या जागेचा आठ-अ नमुना आमच्या नावावर करावा अशी मागणी गावकरी करत आहेत.
याप्रकारची मागणी याआधीही त्यांनी अकोट उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे केली होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिलीप बोचे यांच्यासह या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन याबाबत निवेदन दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबत दोन दिवसांत अकोट येथे बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा : अंत्यविधीला जाताना काळाचा घाला; सांगलीजवळ विहिरीत गाडी पडून 5 जणांचा मृत्यू