अकोला - पावसाअभावी शेतकरी अडचणीत आले आहेत. हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचाही फटका बसत आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. यासोबतच कर्जाचे वाटप आणि पिक विम्याच्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, या मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी बैलबंडीसह मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर शुक्रवारी धडकले. तसेच शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत शासनाला मदतीची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पिक विमा तसेच नुकसान भरपाई मिळाली नाही. यासोबतच पीक कर्जाचे पुनर्गठन केल्याशिवाय नवीन कर्ज भेटणार नाही. तसेच शेतकऱ्यांना मागील कर्ज भरल्याशिवाय नवीन कर्ज भेटणार नसल्याच्या शासनाच्या या आदेशामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच या खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेत टाकत आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी बैलबंडी घेऊन तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले आहे.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली मते मांडली. त्यांच्या संवेदना सगळ्याच शेतकऱ्यांच्या परिस्थितीशी जुळत असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजून अनुमोदन केले. शासनाने आम्हाला तत्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते राजेश वानखडे यांनी केली आहे. या आंदोलनानंतर तहसीलदारांना तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.