अकोला - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रशासनाने परवानगी दिलेल्या काही अस्थापने निर्धारित वेळेत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. लॉकडानच्या काळामध्ये या व्यतिरिक्त कोणतेही व्यावसायिक कारखाने उघडण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. तरीही सिंधी कॅम्प जवळील वसंत पुंगली कारखाना सुरू होता. प्रशासनाने कारवाई करत कारखाना सील करण्यात आला आहे.
संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व काही बंद असताना मनपाच्या डोळ्यात धूळफेक करून कमल चंदवानी हे त्यांचे वसंत पुंगली कारखाना चालवित होते. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कोरोनासारख्या विषाणूचा संसर्ग वाढविण्यासारखा प्रकार होत असल्याच्या कारणाने मनपा आरोग्य विभागाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी पथकाने कारखाना सील करून कमल चंदवानी यांच्यावर कारवाई केली.
ही कारवाई मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये आणि उपायुक्त वैभव आवारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. कारवाईत क्षेत्रीय अधिकारी संदीप गावंडे, आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, बाजार/परवाना विभाग प्रमुख संजय खराटे, गौरव श्रीवास, आरोग्य निरीक्षक प्रताप राउत, बाजार विभागाचे सुरेंद्र जाधव, सनी शिरसाट, दिनेश ठाकरे, रविंद्र निवाणे यांनी केली.