अकोला - पकडायला गेले स्पिरीट आणि हाती लागले गढूळ पाण्याचे ड्रम, अशी अवस्था काल राज्य अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांची झाली होती. कारवाई नेमकी कशाची? असाच प्रश्न त्यांना यावेळी पडला होता. राज्य अबकारी विभागाचे निरीक्षक काळे यांना एका ट्रकमध्ये स्पिरीट असलेले ड्रम येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रिधोरा ते व्याळा या गावांदरम्यान ट्रक पकडला. या ट्रकमध्ये खराब टोमॅटोच्या कॅरेटच्या मागे 26 ड्रम मिळून आले. हे ड्रम गढूळ पाण्याने भरले होते. त्यामुळे, राज्य अबकारी विभागाची स्पिरीट पकडण्याची कारवाई फोल ठरली.
हेही वाचा - अकोल्यात लिंकींग करुन खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करा - जिल्हाधिकारी
धुळे येथून खराब टोमॅटोचे कॅरेट्स भरून निघालेला आयशर ट्रक अकोला जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येत असल्याची माहिती अबकारी विभागाचे निरीक्षक काळे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रिधोरा ते व्याळा या गावाच्या दरम्यान सापळा रचला आणि हा ट्रक पकडला. हा ट्रक घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर घेऊन आले. या ट्रकमध्ये असलेले टोमॅटोचे कॅरेट्स खाली काढून त्याच्या आड असलेले 26 ड्रम ताब्यात घेतले. या ड्रममधील द्रव्याची पाहणी केली असता, हे द्रव्य निव्वळ गढूळ पाणी असल्याचे दिसून आले.
अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रक नेणारे सोनाजी सुरोशे आणि आशिष काशिनाथ या दोघांची कसून चौकशी केली. यात हा ट्रक अमरावती येथे पोहोचवण्यासाठी पंचवीस हजार रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. धुळे येथे आलेल्या या ट्रकच्या चालकाने हा ट्रक अमरावती येथे पोहोचविण्यासाठी दिला. तेथे येणाऱ्या दुसऱ्या व्यक्ती जवळ हा ट्रक देण्याचे त्याने सांगितले. या ट्रकमध्ये नेमके काय आहे? हे कोणीही सांगितले नसल्याचे ट्रकमधील चालक व वाहकाने अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
विविध चालकांच्या माध्यमातून हा ट्रक नेमका कुठे पोहोचविण्यात येणार होता? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ट्रकमधील गढूळ पाण्याचे नेमके गुड काय आहे? असे कोडे आता अबकारी विभागासमोर उभे आहे. खराब टोमॅटोच्या कॅरेटच्या मागे गढूळ पाण्याचे 26 ड्रम लपवून का नेण्यात येत होते? असा प्रश्नही अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.
गढूळ पाण्याचे ड्रम लपवून येत असल्याच्या कारणावरून अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ड्रममधील गढूळ पाण्याचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्यामुळे, आता या गढूळ पाण्याच्या प्रयोग शाळेतील अहवालावर आबकारी विभाग पुढील तपासाची दिशा ठरविणार, अशी माहिती अबकारी विभागाचे निरीक्षक काळे यांनी दिली.
हेही वाचा - रेमडेसिवीरच्या बाटलीवर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक लिहा ; अन्न व औषध विभागाचे निर्देश