अकोला - राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा परिणाम विकास कामांवर होणार आहे.
कोरोनामुळे लांबल्या होत्या निवडणुका-
राज्यासह जिल्ह्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. परंतु कोविड-१९ ची परिस्थिती उद्भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता.
ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले-
दरम्यान, आता डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत राज्यातील सुमारे ४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. दरम्यान आता संबंधित ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम-
- निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.
- नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल.
- नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.
- मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.
- मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल.
या ग्रामपंचायतींमध्ये होणार निवडणूक-
तालुका ग्रामपंचायत संख्या
तेल्हारा-३४
अकोट- ३८
मूर्तिजापूर- २९
अकोला- ३६
बाळापूर -३८
बार्शीटाकळी- २७
पातूर- २३
हेही वाचा- जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी