अकोला - कोरोना विषाणीचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा दुसरा अहवाला सायंकाळी आला. या अहवालानुसार आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अकोल्यात आज आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा संसर्ग तपासणीचे 58 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 50 अहवाल निगेटीव्ह तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
सकाळचा अहवाल प्राप्त झाला तेव्हा सहा जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. तर सायंकाळी पाच वाजता प्राप्त अहवालात दोघा जणांचे अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालातील एक रुग्ण हा मोहम्मद अली रोडवरील रहिवासी आहे. तर अन्य पाच हे अकोट फैल, मेहेरनगर, सुधीर कॉलनी, शिवाजी नगर, कमलानगर अशा पाच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. हे पाचही जण एकाच खासगी रुग्णालयात काम करतात. त्यात डॉक्टरचाही समावेश आहे.
२८ तारखेला अत्यवस्थ अवस्थेत दाखल ज्या महिला रुग्णाचा लगेच मृत्यू झाला होता, त्या महिलेच्या संपर्कात हे पाचही जण आले होते. शासकीय रुग्णालयात येण्याआधी ती महिला या खासगी रुग्णालयात गेली होती. सायंकाळी अहवाल आलेल्या रुग्णांत एका ३० वर्षीय महिलेचा समावेश असून अन्य एक ४० वर्षीय पुरुष आहे. ते फतेह चौक व बैदपुरा या भागातील रहिवासी आहेत. त्यांचे संपर्क शोधण्याचे काम सुरू आहे.