अकोला - जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाची ड्रायरन प्रक्रिया जिल्हा स्त्री रुग्णालयांमध्ये शुक्रवारी सकाळी करण्यात आली. जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. महापालिका क्षेत्रातील अशोक नगर बार्शी टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कान्हेरी सराप आरोग्य केंद्रामध्ये ही मोहीम राबवण्यात आली. जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल यांच्यावर प्रथम प्रात्यक्षिक करण्यात आले.
चार केंद्रांवर लसीकरण
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आरोग्य उपसंचालक तथा जिल्हा शल्यचिकित्सक प्रभार असलेले डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. कोविड काळात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या 7 हजार 331 कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये 730 कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यातील 4 केंद्रांवर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वच ठिकाणी प्रशासनाच्या आदेशानुसार मोहीम राबवण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात लसीकरण केंद्राची पाहणी केली. जिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल यांनी त्यासंदर्भात त्यांना माहिती दिली.
हेही वाचा - ठरलं..! 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशकात होणार