अकोला - कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. पुरुषोत्तम तायडे असे त्या नराधम डॉक्टराचे नाव आहे. रामदास पेठ पोलिसांनी त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खामगाव तालुक्यातील एक अपंग महिला तिच्या आई आणि भावासोबत पोट दुखीवर उपचार घेण्यासाठी दुर्गा चौकातील डॉ. पुरुषोत्तम तायडे याच्या अमृत रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरने तिची सोनोग्राफी करण्यासाठी तिला कक्षात बोलाविले. परंतु, डॉक्टराने तिच्या आई आणि भावाला बाहेरच उभे केले. त्या दोघांना शंका आल्याने त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डॉक्टरने त्या दोघांना कक्षाच्या बाहेर काढले. डॉक्टरने त्या महिलेसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे चिडलेल्या महिलेने डॉक्टरच्या कानशिलात मारली. त्यानंतर ती महिला बाहेर आल्यानंतर तिने हा प्रकार आई आणि भावाला सांगितला.
या प्रकरणी पीडित महिला आणि तिच्या आई आणि भावाने रामदास पेठ पोलीस ठाण्यात डॉक्टरच्या गैरवर्तनुकी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये डॉ. पुरुषोत्तम तायडे यांच्याविरोधात भादवी कलम 354, 376 सी (डी) एल, 377 नुसार गुन्हा दाखल केला आहे. रामदास पेठ पोलिसांनी डॉ. पुरुषोत्तम तायडे यास अटक केली आहे. दरम्यान, रामदास पेठ पोलिसांनी त्यास आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.