अकोला - खरीप हंगाम २०१९ करता प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अकोला तालुक्यातील कौलखेड जहाँगीर येथील ऑनलाईन विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना, पीक विम्याची रक्कम कमी मिळाली आहे. तब्बल 96 लाख रुपये कमी वाटण्यात आले आहेत. ही रक्कम वारंवार पाठपुरावा करून देखील शेतकऱ्यांना दिली जात नाहीये. त्यामुळे संबंधित शेतकरी विमा कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देखील दाखल केली आहे.
खरीप हंगाम २०१९ ला पळसो मंडळामध्ये सोयाबिन पिकासाठी प्रती हेक्टरी 23 हजार 700 रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर कंपनीकडून 14 हजार 400 रुपये प्रती हेक्टरप्रमाणे पैसे जमा करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांचे हेक्टरमागे 9 हजार 300 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही रक्कम जवळपास 96 लाखांच्या घरात आहे. ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी रणधीर सावरकर यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना फरकाचे पैसे न देणाऱ्या ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.