अकोला - बोरगाव मंजूतील मुख्य रस्त्याजवळ असलेल्या भाजी बाजारात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आज (गुरुवार) सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संजय धुळधर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
भाजी बाजारात संजय धुळकर यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, ठाणेदार हरीश गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. या व्यक्तीच्या अंगावर रक्ताचे डाग आढळून आले. त्याची हत्या करून मृतदेह भाजीबाजारात आणून टाकला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी, ठसे तज्ञ ,श्वानास पाचारण करून घटनेचा शोध सुरू आहे. या व्यक्तीची हत्या नेमकी कुणी केली, यामागील नेमके कारण काय, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. घटनेचा तपास ठाणेदार हरीश गवळींसह गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.