अकोला - कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्यात 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. जीवनावश्यक वस्तू आणि पेट्रोल पंप वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. असे असतानाही जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असून पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
प्रशासनाकडून विविध उपाययोजना
दिवसेंदिवस कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, तरीही रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी 24 तासांच्या संचारबंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर सोमवारी एक दिवसाची उसंत घेऊन 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत परत संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू आणि औषधे, पेट्रोलपंप सुरू राहणार आहेत. परंतु, जीवनाश्यक वस्तू आणि पेट्रोल पंपावर नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. नागरिक तोंडाला मास्क लावून फिरत आहेत. दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद असली, तरीही काही जणांनी ही प्रतिष्ठाने सुरू केले आहेत. त्यामुळे अशा प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागात एकत्र फिरत आहे. संबंधितांवर कारवाई करीत आहे. त्यामुळे संचारबंदीचे नियम भंग करणाऱ्यांवर कारवाई होत असल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.