अकोला - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील व्याळा जवळ डीझलने भरलेला टँकर उलटल्यामुळे त्यातील सांडलेले डिझेल नागरिकांनी अक्षरशः जमा केले. बादल्या, प्लास्टिक कॅन, प्लास्टिक बॉटलमधून नागरिकांनी डिझेल भरून नेले. राष्ट्रीय महामार्गावर या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या अपघातात कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. ही घटना आज ( दि. 14 नोव्हेंबर) दुपारी घडली.
अकोला येथून खामगावकडे जाणारा टँकर राष्ट्रीय महामार्ग सहावरील व्याळा जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे उलटला. हा टँकर डिझेलने भरलेला होता. टँकर उलटल्यानंतर त्यातील डिझेल हे खाली सांडत होते. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात हा टँकर उलटला. त्याच खड्ड्यात हे डिझेल जमा झाले.
हा प्रकार पाहून येथून जाणाऱ्या नागरिकांनी तसेच काही ग्रामस्थांनी सांडणारे डिझेल जमा करण्यासाठी मोठी गर्दी केली. मिळेल त्या साहित्याने डिझेल जमा करण्यात येत होते. प्लास्टिक कॅन, बादली, प्लास्टिक बॉटल यासोबतच काही जणांनी तर प्लास्टिक पिशवीत डिझेल जमा केले.
दरम्यान, या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. डिझेल जमा करण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता कुठला ही अपघात घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हे ही वाचा - धनादेश वाटपावरून भाजपा-सेनेच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी; भाजपा नगरसेवकास अटक