अकोला - कृषी क्षेत्राचा आणि शेतकऱ्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही, असे मत दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व सी-डॅक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी क्षेत्राला महासंगणकाची जोड देणाऱ्या देशातील पहिल्या 'परम शावक सृष्टी' या महासंगणकाचा लोकार्पण सोहळा धोत्रे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी धोत्रे बोलत होते.
'परम शावक सृष्टी' महासंगणक कृषी क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. नवतंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रातील समस्या जलदगतीने सोडवण्यात हे महासंगणक महत्वाची भूमिका बजावणार आहे.
हेही वाचा - दुबईला प्रायोगिक तत्वावर १४ मेट्रिक टन भाजीपाल्याची निर्यात
लोकार्पण सोहळ्यात बोलताना सी-डॅकचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी म्हणाले, "अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिल्यानंतर स्वत: देशासाठी महासंगणकाची निर्मिती करणाऱ्या डॉ. विजय भटकर यांच्या जिल्ह्यात 'परम शावक सृष्टी' महासंगणकाचे लोकार्पण प्रेरणादायी ठरेल" या संगणकाच्या माध्यमातून नवतंत्रज्ञान, बाजारभाव आणि कृषी क्षेत्रातील बदलांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहचवण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दिली आहे.