अकोला - महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बुधवारी बैठक पार पडली. बैठकीत नगरसेवकांनी ठरावाच्या प्रती फाडल्याने काही काळ वातावरण तापले होते. टॅक्सबाबत नागरिकांना होणार त्रास यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाल्याने हा प्रकार घडला. शिवाय नगरसेवकांनी सभात्यागही केला.
हेही वाचा -अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतल्या 73 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
स्थायी समितीचे सभापती विनोद मापारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. सुरवातीला मागील स्थायी समितीचे इतिवृत्ताची चर्चा करण्यात आली. स्थायी समितीच्या बैठकीत टॅक्सबाबत नागरिकांना होणारा त्रासासंदर्भात नगरसेवक फय्याज खान यांनी मुद्दा उपस्थित केला. तसेच महिला व बालकल्याण सभापती तसेच विभागाकडून कुठल्याच उपायोजना केल्या जात नसल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका धनश्री अभ्यंकर यांनी केला. या दोघांच्याही प्रश्नाला स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही नगरसेवकांनी ठरावाच्या प्रती फाडत सभात्याग केला.
महिला व बालकल्याण समितीचा विषय सुरु असताना नगरसेविका अॅड. धनश्री अभ्यंकर यांनी विषयाला विरोध केला. महिला व बालकल्याण विभागाची कोणतीही योजना राबविण्यात आली नाही. या योजना न राबवल्याने महिलांना कोणताच लाभ मिळाला नाही. त्यामुळे या विषयाला मंजुरी देण्याचे कारण काय, असा प्रश्न अभ्यंकर यांनी उपस्थित करित ठरावाच्या प्रति फाडल्या व सभागृहाबाहेर गेल्या.