अकोला - महापालिकेने जुन्या शहरातील आंबेडकर क्रीडांगणावर भाजी बाजार स्थापन केला आहे. याठिकाणी सामाजिक अंतर राहावे म्हणून व्यावसायिकांना आखणी करून दिली आहे. बाजारात येणाऱ्यांना मास्क लावून येणे आवश्यक असतानाही अनेक नागरिक येथे तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून आलेले नव्हते. अशा नागरिकांची आज मनपा स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांनी गांधीगिरी करीत त्यांचे अक्षरशः औक्षण करून आरती केली. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे एकच चर्चा झाली होती. तसेच माध्यमातून त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्नही केला.
कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी तोंडावर मास्क किंवा रुमाल लावणे गरजेचे आहे. याबाबत शासनाकडून तथा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वारंवार सूचना करण्यात येतात. असे असतानाही अनेक नागरिक भाजी बाजारांमध्ये तोंडावर कुठल्याही प्रकारचा मास्क किंवा रुमाल बांधून आल्याचे दिसत नव्हते. याबाबत भाजीबाजारात उपस्थित मनपा कर्मचारी तथा पोलिसांनी नागरिकांना दंडुकाही दाखविला.
मात्र, परिस्थिती दररोज 'जैसे थे'च असायची. यावर उपाय म्हणून महापालिका स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांनी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधून न येणाऱ्या नागरिकांचे भाजीबाजारात दिसेल त्या ठिकाणी हळद व कुंकू लावून औक्षण केले. त्यांची आरतीही ओवाळली. भाजी बाजारातील हा प्रकार पाहून अनेक नागरिकांच्या तोंडावर हसू फुलले. स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांच्या गांधीगिरीमुळे नागरिकांमध्ये आतातरी जनजागृती निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.