अकोला - जिल्ह्यातील कोरोना संदिग्ध रुग्णाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या रुग्णाचा अहवाल आज आला असून तो पॉझिटिव्ह आल्याने त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जाहीर केले आहे. कोरोनाचा हा अकोल्यातील पहिला बळी आहे.
शहरात राहणारा 45 वर्षीय रुग्ण सोमवारी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, खोकला याचा त्रास असल्याने खबरदारी म्हणून त्या रुग्णाचे घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचदिवशी रात्री साडेआठ वाजता उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला.
आज सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. कोरोना रुग्णाचा अकोल्यातील हा पहिला मृत्यू असून अकोल्यातील रुग्णांची संख्या 14 आहे. तर, 10 एप्रिलला एका कोरोना रुग्णाने आयसोलेशन वार्डातील स्वच्छतागृहात स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली होती. यामुळे दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या सध्या 12 आहे.