अकोला - जिल्ह्यात आज दिवसभरात १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १३ वर कायम आहे. दरम्यान, या १३ जणांपैकी एका रुग्णाने आज पहाटे आत्महत्या केल्याने आता जिल्ह्यात १२ पॉझिटिव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल आहेत. २४ तासात ९ जण संशयित रुग्ण म्हणून दाखल झाले. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.
आतापर्यंत १८७ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत, तर आणखी तिघांचे नमुने दुबार तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी १३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १२६ निगेटिव्ह आहेत. तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
कोरोना विषाणुसंदर्भात चाचणीअंती निगेटिव्ह अहवाल आलेले परंतु वैद्यकीय निरीक्षणात व अलगीकरण करुन ठेवणे आवश्यक असलेल्या २७ जणांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात स्थलांतरित करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात हे लोक आतापर्यंत निरीक्षणात होते. तेथून त्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ही स्थलांतराची कारवाई प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार व तहसीलदार विजय लोखंडे यांनी पार पाडली.
क्वारंटाईन वार्डात या व्यक्तिंना नाश्ता, चहा, जेवणाच्या व्यवस्थेसह एका कक्षात एक व्यक्ती याप्रमाणे राहण्याची सोय आहे. तसेच या कक्षासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.