अकोला - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते म्हणून व्यवसाय करणारे शेतकरी शशिकांत मानकर यांनी रविवारी आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी काढलेल्या व्हिडिओतून भावनिक आवाहनही केले होते. या संदर्भात त्यांच्या भावांनी जिल्हा उपनिबंधक तथा सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर आज सहकार विभागाने अकोला शहरात दोन आणि म्हैसांग या गावात एक अशा तीन ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये अवैध सावकारीच्या संदर्भातील कागदपत्रे तपासण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याची स्थिती आहे. तसेच शेतकऱ्यांकडे शिलकीचे पैसेही नाहीत. घरात पडलेल्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने ते पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे पेरणीसाठी पण सध्या पैसे नाहीत. परिणामी, शेतकरी सावकाराकडे धाव घेत आहे. अशा परिस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते व्यावसायिक तथा शेतकरी शशिकांत मानकर यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी भावनिक व्हिडिओ काढून यासंदर्भात ते त्यामध्ये बोलले होते.
याबाबत मानकर यांच्या भावांनी जिल्हा उपनिबंधक तथा सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने तीन पथके तयार करीत अकोला शहरातील दोन आणि म्हैसांग या गावामध्ये एक अशा तीन पथकांच्या माध्यमातून छापा मारला. या छाप्यात संबंधिताच्या घरात अवैध सावकारी संदर्भातील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून याबाबतचा संपूर्ण अहवाल मंगळवारी प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.