अकोला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लाखनवाडा, कापशी, म्हैसपूर फाटा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सोयाबीन, कपाशी व ज्वारीच्या पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांनी त्यांना शेतातील नुकसान झालेली पिके दाखविली. यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झालेल्या नुकसानीबाबत मदतीची मागाणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला लाखनवाडा या गावातील शेतकरी संजय अघडते आणि केशव गावंडे यांच्या शेतात पाहणी केली. येथे त्यांनी अघडते यांच्या शेतातील सडलेले सोयाबीन आणि पाण्यात असलेल्या आणि गळालेल्या कपाशीच्या बोंडांची पाहणी केली. यावेळी अघडते यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली. कापशी येथील मनोहर गावंडे, राहुल निखाडे, चिखलगाव येथील विनोद थोरात या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आपल्या समस्यांचा पाडा वाचला.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सडलेले सोयाबीन, कपाशी आणि काळी पडलेली ज्वारी हातात घेवून त्याची पाहणी केली. त्यासोबतच या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी व संबंधित अधिकार्यांची आढावा बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांकडून नुकसानीच्या अहवालाची माहिती घेतली. तसेच बऱ्याच ठिकाणी झालेल्या पंचनाम्या संदर्भातील तक्रारीही अधिकाऱ्यांकडून ऐकून घेतल्या. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्यासह आदी लोकं उपस्थित होते.
हेही वाचा- परतीच्या पावसाने भरलेल्या काटेपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा