अकोला - संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत जुगार खेळणाऱ्या 28 जणांवर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने कारवाई केली आहे. गायगाव येथील शेतशिवारातील दोन मजली इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने आज (दि. 23 मे) रात्री छापा टाकला. या छाप्यात पथकाने 28 जणांवर कारवाई केली असून 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांवर उरळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा जुगार अड्डा हाय प्रोफाईल असल्याचे यावरून दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी गायगाव येथील एका शेतातील दोन मजली इमारतीमध्ये जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून छापा टाकला. यामध्ये जवळपास 28 जणांना त्यांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जुगारातील दोन लाख रुपये रोख रक्कम, सहा लाख रुपये किंमतीचे बारा दुचाकी किंमत आणि सात लाख रुपयांची एक चारचाकी, असा एकूण 17 लाख रुपयांचा ऐवज पथकाने जप्त केला. हे शेत उरळ येथील प्रकाश वानखडे याचे असून त्याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते. या सर्वांवर उरळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये पथकाने बड्या घरातील नागरिकांसह काही राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही पकडले असल्याचे समजते. हा जुगार अड्डा हायप्रोफाईल असल्याचे या कारवाईवरून सिद्ध होत आहे.
उरळ पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
उरळ पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गायगाव या ठिकाणी येथील एका शेतामध्ये दुमजली इमारतीत जुगार अड्डा असल्याचे आज झालेल्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे. विशेष पथकाने केलेल्या या कारवाईमधून उरळ पोलिसांची अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी असलेले साहित्य मोठे लाकडी टेबल तसेच खुर्च्या यासह आदी साहित्य मिळाले आहे. त्यामुळे या जुगार अड्ड्याकडे पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - शेतात मंदिर बांधू दिले नाही म्हणून पोलीस पाटील कुटुंबावर ग्रामस्थांचा बहिष्कार